मुंबई : 'महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे', असं म्हणत अरविंद केजरीवाल यांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलाय.
लातूरला आणखी गाड्या लागल्या तर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन प्रभूंनी दिलंय. यामागचं कारण स्पष्ट करताना 'लातूरला अजून रेल्वे लाइन नाही तर सिंगल ट्रॅक आहे. जिथे ट्रेन थांबवता येईल, पाणी घेता येईल अशी सोय नाही... ट्रेन आली तर इतर रेल्वे वाहतूक डिस्टर्ब होईल... त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे त्यांची मदत नाही घेऊ शकत', असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लातूरला राजधानी दिल्लीतून पाणी पाठवण्याची तयारी दर्शवली होती. दररोज दहा लाख लीटर पाणी देण्याची तयारी केजरीवालांनी दाखवली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचे दोन महिने हे पाणी पुरवणार असल्याचं केजरीवालांनी सांगितलं. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून रेल्वेनं पाणी नेण्यासंदर्भातल्या उपाययोजना करण्याचं आवाहन केंद्राला केलंय. सध्या मिरजहून लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा केला जातोय. केंद्राच्या या निर्णयाचं केजरीवाल यांनी पत्रातून स्वागत केलं असून मोदींचं कौतुकही केलंय.