ठाणे / जळगाव : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झालेत. एक घटना आहे ठाण्यातली तर दुसरी घटना घडलीय जळगावमध्ये...
ठाण्यातील कोपरी पूल ते ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलमधून एका युवकाला फेकून देण्याचा प्रकार घडलाय. पाकीट चोरीला विरोध करणाऱ्या युवकाला चोरट्यांनी थेट गाडीतून फेकून दिलं. कोपरी पूल ते ठाणे स्टेशन या दरम्यान ही घटना घडलीय. जखमी युवकाला स्थानिकांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केल्याने तो या जीवघेण्या हल्ल्यातून वाचलाय. मात्र हा प्रकार घडल्यावर पोलिसांनी अपघाताची नोंद केलीय. गौरव पुंजवानी असं जखमी युवकाचं नाव आहे.
तर दुसरीकडे, धावत्या रेल्वेतून तरुणाला परप्रांतीयांनी फेकून दिल्याची घटना जळगावमधल्या धरणगाव चावलखेडा रेल्वे स्थानका दरम्यान घडलीय. भूषण भदाणे हा तरुण गांधीधाम पुरी एक्स्प्रेसमधून अमळनेरहून जळगावला जात होता. डब्यात जागा नसल्यानं, दारात बसून तो मोबाईल हाताळत होता. त्यावेळी दोन-तीन परप्रांतीय तरुणांनी त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली. त्याला भूषणनं नकार दिला. म्हणून, त्या तिघांनी त्याला धावत्या गाडीतून फेकून दिलं. त्याच्यावर जळगाव मधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.