मोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं...  

Updated: Oct 13, 2014, 01:00 PM IST
मोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं... हेच भाषण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काँग्रेसनं याच भाषणाच्या प्रक्षेपण म्हणजे 'पेड न्यूज' असल्याचं म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेडिसन स्क्वेअर गार्डनवर झालेलं भाषण आज महाराष्ट्रातील विविध चॅनलवर दाखवलं जाणार आहे. 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ' म्हणत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना पंतप्रधानांचं हे अमेरिकेतलं भाषण वाहिन्यांवर दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, आज सायंकाळी सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपुष्टात येणार आहे.

यावरच, काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. 'महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हेतू यामागे होता हे स्पष्ट आहे. त्यासाठी चॅनेल्सवरील एक स्लॉटच विकत घेण्यात आलाय. बातम्यांची जागा या भाषणाने घेतलीय... मोदींना फोकस करण्याचा हा प्रकार पेड न्यूजसारखाच आहे' असं प्रदेश काँग्रेसनं म्हटलंय. 

पंतप्रधानांचं मेडिसन स्क्वेअरवरचं भाषण हे शासकीय स्वरुपाचं मानलं जायला हवं... त्याचा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापर करणे हा निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.