नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सायंकाळी 'आरएसएस'च्या गडावर म्हणजेच नागपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी, त्यांनी नागपूरचे खासदार देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी 'खडसे' नावाचा विसर त्यांना पडला.

Updated: Oct 7, 2014, 09:01 PM IST
नागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...  title=
'देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र' - भाजपची घोषणा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सायंकाळी 'आरएसएस'च्या गडावर म्हणजेच नागपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी, त्यांनी नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी गडकरी आणि 'खडसे' यांच्या नावाचा विसर त्यांना पडला.

'काँग्रेसनं महाराष्ट्राला गेल्या 15 वर्षांत स्कॅम दिले... घोटाळ्यांवर घोटाळे, मग आणखी एक मोठा घोटाळा... असं घोटाळ्यांत बरबटलेला महाराष्ट्र गेल्या 15 वर्षांत पाहायला मिळाला...' असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

यावेळी, त्यांनी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचं  कोळसा घोटाळा बाहेर काढल्याबद्दल कौतुक केलं. सोबतच, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचंही तोंडभरून कौतुक केलं... 'महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त घोटाळे कुणी समोर आणले असतील तर ते देवेंद्र फडणवीस... विधानसभेत त्यांनी प्रश्नही तळमळीने मांडले' असं म्हणत फडणवीस यांना निवडून देणाऱ्या जनतेचेही त्यांनी आभार मानले. 

'सगळे पॉलिटिकल पंडित चुकले... त्यांचा हिशोब चुकला... कारण, ते जुनी मोजपट्टी घेऊन मोजत होते... युवकांचा त्यांना अंदाजा नव्हता.. माता भगिनींचा अंदाज त्यांनी घेतला नाही... आत्ताही विधानसभा निवडणुकीत पॉलिटिकल पंडितांना भाजप खोटे ठरवणार... भाजप अभूतपूर्व विजयासह स्वबळावर सत्ता मिळविणार...' असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

उल्लेखनीय म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. फडणवीस यांच्या समर्थकांनी 'देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र' अशी घोषणा देऊन या चर्चेला आणखीनच खतपाणी घातलं. महत्त्वाचं म्हणजे, नरेंद्र मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात गडकरी स्टेजवर असतानाही त्यांचा उल्लेख केला नाही तसेच भाजपचे आणखी एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.