एकनाथ शिंदे कामी येणार कुशल संघटन?

जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Updated: Oct 2, 2014, 10:21 PM IST
एकनाथ शिंदे कामी येणार कुशल संघटन? title=

ठाणे : जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हा गजर ऐकवणारा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला. कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि कुशल संघटन यांमुळे एकनाथ शिंदेंनी इथे शिवसेनेचा भगवा फडकावलाय. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुखपद सांभाळणा-या एकनाथ शिंदे यांनी ३३ हजारांच मताधिक्य घेवून विजय मिळवला होता. एकानाथ शिंदे यांना ७३ हजार ५०२ मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या मनोज शिंदे यांना ४० हजार ७२६ आणि मनसेच्या राजन गावंड यांना ३५ हजार ११४ मते मिळाली होती.   
आगामी विधानसभेची निवडणूक पुन्हा याच मतदारसंघातून लढवायची की ठाणे शहर मतदारसंघातून लढायची या विवंचनेत सध्या आमदार एकनाथ शिंदे असल्याचं बोललं जात होत. गेल्या पाच वर्षांतील विकासकामांचा विचार केला असता

विकासकामे....
शहरात पाणी योजना, ठाणे पूर्वेला स्काय वॉक, जॉगिंग पार्क , सचिन तेंदुलकर मिनी स्टेडीयम अशी अनेक विकासकामे केल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. तर आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक महत्वाच्या योजना मार्गी लावता आल्या नाहीत, असा आरोपही शिंदे यांनी केलाय.

काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या भागात काँग्रेसचं बळ आणखी कमी झालंय. तर काँग्रेसकडून पुन्हा एकदा मनोज शिंदे उत्सुक आहेत. तर मागील निवडणुकीत पराभूत झालेले मनसेचे राजन गावंड पुन्हा एकदा लढण्यास उत्सुक होते. त्याचबरोबर रवींद्र मोरे, ओंकार माळी, सेजल कदम, नीता साळवी यांच्या नावाचीही चर्चा होती. यामध्ये सेजल कदम यांच्या नावाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पसंती दिली. एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. यासाठी एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये अनेक दिवस तळ ठोकला होता. त्यामुळे इथल्या मतदारसंघाकडे एकनाथ शिंदे यांचं दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधक करताहेत.
 
दुसरीकडे या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढण्यासाठी माजी महापौर अशोक वैती,  सभागृहनेते नरेश म्हस्के नुकतेच काँग्रेसमधून सेनेत आलेले नारायण राणे समर्थक रवींद्र फाटक हे इच्छुक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यावेळी मतदारसंघ बदलणार का हाही प्रश्न उपस्थित केला जातोय. 

एकूणच लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन विचारे यांना या मतदारसंघातून तब्बल 68406 मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला यंदाही कायम राखण्यासाठी शिवसैनिक कामाला लागलेत. तर मनसे आणि काँग्रेस या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.