'भारत-पाक'वर टीप्पणीनंतर नसरुद्दीन शाहांवर सेनेची आगपाखड!

अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तान संबंधीच्या विधानाचा, शिवसेनेच्या सामना दैनिकातून समाचार घेतला गेलाय. 

Updated: Mar 30, 2015, 03:28 PM IST
'भारत-पाक'वर टीप्पणीनंतर नसरुद्दीन शाहांवर सेनेची आगपाखड! title=

मुंबई : अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तान संबंधीच्या विधानाचा, शिवसेनेच्या सामना दैनिकातून समाचार घेतला गेलाय. 

काही दिवसांपूर्वी नसिरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी आदरातिथ्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी नसिरुद्दीन शाह नुकतेच पाकिस्तानात दाखल गेले होते. यावेळी, लाहोर साहित्य मेळाव्यात त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी, शाह यांनी एका मनोरंजन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या शत्रुत्वावर खेद व्यक्त केलाय. भारतीयांच्या डोक्यात पाकिस्तान त्यांचा शत्रू असल्याचं भरवलं जात असल्याचं यावेळी शाह यांनी म्हटलं होतं. 

नेमकं, काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात... 
पाकिस्तानात चांगले आदरातिथ्य केले म्हणून त्यांचा द्वेष करू नका असे नसिरुद्दीन महाशयांचे सांगणे आहे. नसिरुद्दीन यांना जे ओळखतात ते त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कधीच शंका घेणार नाहीत, पण पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवताच ते भ्रमिष्ट झाले. नसिरुद्दीन यांनी इतक्या वर्षांत जे कमावले ते क्षणात गमावले. कुणी लाहोरात त्यांच्यावर काळी जादू केली काय? नसिरुद्दीन असे कधीच नव्हते हो!

पाकिस्तानच्या कलावंतांना हिंदुस्थानात विरोध होतो. याबद्दल नसिरुद्दीन यांनी स्वदेशी जनतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून वादळ ओढवून घेतले आहे. नसिरुद्दीन यांचे म्हणणे असे की, आम्ही पाकिस्तानात जातो तेव्हा तिथे आमचे जोरदार स्वागत होते. मग पाकिस्तानी कलावंतांच्या कार्यक्रमांत आपल्याकडे धुडगूस का घातला जातो? नसिरुद्दीन शाह यांच्या प्रश्‍नांना उत्तरे कोणी द्यायची, हाच खरा प्रश्‍न आहे. खरे तर आपण पाकिस्तानचा इतका द्वेष का करतो, त्याचे परखड उत्तर मुंबईत कसाबच्या हल्ल्यात जे निरपराध लोक मारले गेले त्यांचे आप्तजनच देऊ शकतील.

श्रीमान नसिरुद्दीन यांनी ‘वेनस्डे’ या चित्रपटात दहशतवादी हल्ल्यात मेलेल्या तरुणाच्या लोकलमधील सहप्रवाशाची हृदयद्रावक भूमिका केली आहे. एक तडफड व आक्रोश, संताप, चीड त्या भूमिकेत दिसते. पाकिस्तानी हल्ल्यांत ज्यांची तरुण पोरे नाहक मेली त्या प्रत्येक बापाची भूमिका जणू नसिरुद्दीन शाह यांनी केली, पण त्यांना हे असे अचानक काय झाले? नसिरुद्दीन यांना जे ओळखतात ते त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कधीच शंका घेणार नाहीत, पण पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवताच ते भ्रमिष्ट झाले. यापूर्वी भल्याभल्यांची हीच अवस्था झाली आहे. हिंदुस्थानी लोकांना पाकिस्तानातील यजमान मंडळी बोलबच्चनगिरीने वश करतात व आमचे येडबंबू तिकडून इकडे येताना टोपी फिरवून येतात. हीच तर पाकिस्तानची कमाल आहे. नसिरुद्दीन शाह यांनी इतक्या वर्षांत जे कमावले ते क्षणात गमावले. कुणी लाहोरात त्यांच्यावर काळी जादू केली काय? कुणी त्यांच्यावर प्रेतपिशाच बाधा केली काय? 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.