मुंबई : भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने वॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय आहे. पण असं असलं तरी सुपरस्टार सलमान खानने मात्र तिला बाद ठरवलंय.
सोहेल खानच्या 'फ्रिकी अली' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सलमान बोलत होता. दीपा कर्माकरच्या पराक्रमाबद्दल सलमानने बोलायला सुरूवात केली खरी पण तो तिचं नावच विसरला. आधी त्याने दीपिका असा उल्लेख केला. पण एका पत्रकाराने त्याला चुकीची जाणीव करून दिली. त्यानंतर त्याने नाव बदलून दिप्ती असे घेतले. पण एवढंच करून सलमान थांबला नाही तर तिच्या पराक्रमाचाही अपमान केला. “मला वाटलं होतं ती सुवर्णपदक जिंकेल पण ती आठवी आली...” असं म्हणत त्याने खेद व्यक्त केला तेव्हा पत्रकारही गोंधळले.
याचवर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या सुल्तान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली. यात सलमान कुस्तीगिराच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याची ऑलिम्पिक संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती. पण मिल्खा सिंग, योगेश्वर दत्त यांसारख्या खेळाडूंनी या निवडीबाबत नाराजी दर्शविली होती. दीपा कर्माकरबाबतचे आपले अज्ञान दाखवून सलमानने खेळाडूंची नाराजी रास्तच होती हे सिद्ध केले आहे.