मुंबई : नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला सैराट सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल यात शंकाच नाही.
मराठी चाहत्यांसोबतच हिंदी तसेच अनेक इंग्लिश चाहत्यांनाही हा चित्रपट भावतोय. नुकत्याच एका हिंदी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागराजला केवळ मराठीतच चित्रपट बनवणार का हिंदीतही येणार असे विचारले असता तो म्हणाला, अद्याप असे काही ठरलेले नाही. मला हिंदीच्या स्टाईलचे चित्रपट करायचे नाहीयेत. मला मराठी माहिती आहे त्यामुळे सध्या तिथेच लक्ष केंद्रित केलेय.
यादरम्यान त्याने मराठी प्रेक्षकांबद्दलचेही मत व्यक्त केले. मराठी चित्रपटांचा साचा जसजसा बदलतोय तसा प्रेक्षकवर्गही बदलतोय. मराठी प्रेक्षक हा प्रगल्भ आहे. ते चित्रपटातील कॅरेक्टर पाहत नाहीत तर ते कहाणी बघतात. चित्रपटाची कथा हेच त्या चित्रपटाचे मूळ असते आणि तेच मराठी प्रेक्षकांना भावतेय. त्यामुळेच फँड्री, एलिझाबेथ एकादशी, सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय, असे नागराज म्हणाला.