अव्यक्त प्रेमाची गोष्ट : खुलता कळी खुलेना

प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ? कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं तयार होतं आणि मग त्या नात्याला नाव देण्याची गरज निर्माण होते. 

Updated: Jul 13, 2016, 03:36 PM IST
अव्यक्त प्रेमाची गोष्ट : खुलता कळी खुलेना title=

मुंबई : प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ? कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं तयार होतं आणि मग त्या नात्याला नाव देण्याची गरज निर्माण होते. 

पण प्रत्येक नात्याला नाव देणंही एवढंच गरजेचं असतं का? जे व्यक्त झालं नाही त्या अनामिक नात्याला म्हणायचं तरी काय ? अव्यक्त प्रेमाची ही हळुवार कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या “खुलता कळी खुलेना” या नव्या मालिकेतून. येत्या १८ जुलैपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. प्रसारित होणार आहे.

ही आहे मालिकेची गोष्ट...

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेची गोष्ट आहे देशपांडे आणि दळवी कुटुंबाची. प्रतिष्ठित दळवी कुटुंब हे आजी-मुलं-सुना-नातवंडांनी फुललेलं एकत्र कुटुंब आहे. आपल्या धारदार नजरेने समोरच्याला निरुत्तर करणारी पार्वती आजी या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आजोबांची वैद्यकशास्त्राची धुरा त्यांचा नातू डॉ.विक्रांत समर्थपणे पेलतो आहे. विक्रांत हा अतिशय समजूतदार, तत्वनिष्ठ आणि व्यवहारी मुलगा आहे. काही वेळा तो स्वतः पेक्षा इतरांचाच विचार जास्त करतो. 

विक्रांतचं लग्न ठरतं देशपांडे कुटुंबातल्या मोठ्या नातीशी म्हणजेच मोनिकाशी. देशपांडे कुटुंब हे आजी आजोबा आणि त्यांच्या दोन नाती असलेलं एक छोटं कुटुंब आहे. आई-वडिलांविना असलेल्या दोघींना आजी-आजोबांनीच मायेने मोठं केलंय. दळवी आणि देशपांडे ही दोन कुटुंबं या लग्नामुळे जोडली गेली आहेत खरी पण त्यांना सांधणारा खरा दुवा वेगळाच असेल तर? या कुटुंबांतल्या दोन व्यक्तींमध्ये एक नातं अलगद तयार होऊ लागतं. कोणाच्याही नकळत! कोणाचं? आणि कोणाशी? ते पहायला मिळेल “खुलता कळी खुलेना”मधे.

या मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे ते यातील दमदार स्टारकास्ट. केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपल्या कामाचा दबदबा निर्माण केलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सविता प्रभुणे. मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमधून अनेकविध भूमिकांचा अनुभव असलेले चतुरस्र अभिनेते संजय मोने, लोकेश गुप्ते, शर्वरी लोहकरे, मानसी माग्गीकर आणि आशा शेलार या अनुभवी कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यातून बघायला मिळणार आहे. 

मालिकेत डॉ. विक्रांत दळवी ही मुख्य भूमिका ओमप्रकाश शिंदे या अभिनेत्याने साकारली असून अभिज्ञा नाईक आणि मयुरी देशपांडे या अभिेनेत्री मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. आजवर अनेक यशस्वी मालिकांचे दिग्दर्शन करणारे हेमंत देवधर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. संतोष भारत कणेकर यांच्या अथर्व थिएटर्स अॅंड इव्हेंट्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

अबोल प्रेमातून तयार झालेल्या एका अनामिक ओढीची आणि नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे