रिव्ह्यू: उर्मिला-जितेंद्रची 'काकण' एक अधुरी प्रेम कहानी

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला 'काकण' हा मराठी सिनेमा आज बिग स्क्रीनवर झळकलाय. सिनेमा बाबत उत्सुकतेचं एकमेव कारण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकरचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिला सिनेमा.

Updated: Apr 10, 2015, 04:56 PM IST
रिव्ह्यू: उर्मिला-जितेंद्रची 'काकण' एक अधुरी प्रेम कहानी title=

मुंबई: अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला 'काकण' हा मराठी सिनेमा आज बिग स्क्रीनवर झळकलाय. सिनेमा बाबत उत्सुकतेचं एकमेव कारण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकरचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिला सिनेमा.

कथा:
१९७० च्या काळातली ही प्रेमकथा. किसु आणि सुधामती या दोघांची ही गोष्ट. कोकणातल्या एका गावात  राहणारे हे दोघं एकमेकांवर जिवापाड प्रेम करत असतात. एकाद्या फिल्मी प्रेम कहाणी प्रमाणेच यांच्या वाट्याला अनेक अडचणी येतात. किसू आणि सुधामतीच्या या लव्हस्टोरीचं काय होतं? एका काकणमुळं त्याचं आयुष्य कसं बदलून जातं. अशा काहीशा आशयावरचा हा सिनेमा आहे. याच कथेत गोपी नावाच्या एका लहान मुलाची एंट्री होते, हा मुलगा या दोघांमध्ये काय करतो, हा अँगल दिग्दर्शिका क्रांतीनं खूप छान पद्धतीनं हाताळलाय. या सिनेमाची कथाही क्रांती रेडकरचीच आहे.

दिग्दर्शन

क्रांतीचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असल्यामुळं या सिनेमावर सगळेचजण नजर राखून आहेत. क्रांतीचा पहिला प्रयत्न म्हणून जर आपण पाहिलं तर तिनं खरंच सिनेमाची धुरा अगदी परफेक्ट सांभाळली आहे. एक इमोशनल लव्हस्टोरी हाताळतांना ज्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला पाहिजे त्या सगळ्या एलिमेन्ट्सची तिनं योग्यरीत्या मांडणी केली आहे. एक दिग्दर्शका म्हणून तिनं तिचा रोल पूर्ण डेडिकेशननं निभावला आहे. सिनेमाचा स्क्रीनप्लेमध्ये तुम्हाला सतत वेगळे वेगळे ग्राफ्स जाणवतील. कधी सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो तर कधी पुन्हा ट्रॅकवर येतो. हे सगळं व्यवस्थित हाताळणं तसं पाहिलं तर सोपं नाही. पण क्रांतीनं एक नवोदित दिग्दर्शिका असून सुद्धा हो सगळं उत्तम जमवलंय. 

अभिनय

अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे ही या सिनेमात खरंच भाव खावून जाते. तिनं साकारलेल्या सुधामतीचे दोन शेड्स आपल्याला अनुभवायला मिळतात.. एकिकडे एक चंचल सोज्वळ गावात राहणारी निरागस सुधामती या व्यक्तिरेखेत ती आपल्याला दिसते तर दुसरीकडे शहरात राहणारी एक मॅच्युअर्ड शांत आणि आयुष्यातले अनेक टप्पे अनुभवलेल्या सुधामतीच्या रुपात ती पहायला मिळते.
या सिनेमातला उर्मिलाचा अभिनय खरंच कौतुकास्पद आहे.

जितेंद्र जोशीनं साकारलेला किसूही चांगला झालाय.  खरंतर सिनेमात जितका स्कोप उर्मिला कानिटकरला आहे, तितका जितेंद्रच्या वाट्याला आलाय का? याबाबत शंका वाटते. त्याला फार संवाद नसतील पण अभिनयाच्या बाबतात त्यानंही बाजी मारलीये.

सिनमेात आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे जे साकारलंय, याच बरोबर अभिनेत्री माधवी जुवेकर यांची भूमिका जरी लहान असली तरी त्यांनी ती अप्रतिम साकारली आहे.

संगीत

'काकण' या सिनेमात तशी फार गाणी नाहीत पण काकण हे टायटल ट्रॅक छान झालंय. याची गीतकार आहे स्वत: क्रांती आणि ओमकार दत्त आहेत. नेहा राजपाल आणि शंकर महादेवन यांच्या आवाजातलं हे गाणं अप्रतिम झालंय.

सिनेमात काही गोष्टी खटकतात ते म्हणजे या सिनेमातले काही अनवॉन्टेड सिन्स. काही असे सिन्स जे वर्षानूवर्ष आपण प्रेम कथेवर आधारित सिनेमांमध्ये पाहत आलोय. आणखी एक मुद्दा म्हणजे. सिनेमाटोग्राफी मधल्या काही बारीक-सारीक त्रुटी सिनेमा पाहताना जाणवतात. 

या सगळ्यागोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आम्ही या सिनेमाला देतोय तीन स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.