मुंबई : चित्रपटाचे शूटिंग करता करता समजा कोणाचा आवाज गेला तर त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार करु शकाल का? अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली 'लवशुदा' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी. या चित्रपटातील गाण्याचं शूटिंग सुरू असताना अभिनेता गिरीश कुमारचा आवाज गेला.
गिरीश कुमार 'रमैय्या वस्तावैय्या' या चित्रपटात पहिल्यांदा दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्याला एका सीनसाठी जोरात ओरडण्याची आवश्यकता होती. हा सीन झाला खरा. पण, त्यानंतर चित्रपटातील 'पिने की तमन्ना' या गाण्यात खरेपणा आणण्यासाठी त्याने दारू पिण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो अगदी थंडगार दारू प्यायला.
पण, इतक्या जोरात ओरडल्यावर थंडगार दारू पिण्याचा निर्णय त्याच्यावरच उलटला. शूटिंगनंतर पॅकअप करताना त्याचा आवाजच गेला होता. हे पाहून सेटवर सर्वजण घाबरले. पण, काही वेळानंतर त्याचा आवाज परत आला. त्याचा आवाज परत आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.