www.24taas.com, झी मीडिया, सॅटियागो
‘खून के आँसू’ हा हिंदीतील शब्दप्रयोग तुम्हाला ज्ञात असेलच... हाच शब्दप्रयोग सत्यात उतरलाय. होय, दक्षिण अमेरिकेतील एक तरुणी जेव्हा रडते तेव्हा तिच्या डोळ्यांतून पाणी नाही तर रक्त बाहेर पडतं. या विचित्र घटनेमुळे तज्ज्ञदेखील काळजीत सापडले आहेत.
‘चिली’च्या लॉस लागोस क्षेत्रातील ओसोर्नो प्रांतातील परांक शहराची रहिवासी असलेल्या यारिजा ऑलिवा हिच्यासोबत ही घटना घडलीय. या महिन्याच्या सुरुवातीलाच २० वर्षीय ऑलिवा हिच्या डोळ्यांतून पाण्याऐवजी रक्त येणं सुरू झालं आणि त्यानंतर ही मुलगी अधिकच घाबरली. त्यामुळे तिच्या डोळ्यांतून गालांवर ओघळणाऱ्या रक्ताचं प्रमाणही वाढलं.
डॉक्टरांना मात्र ऑलिवाच्या डोळ्यांत कोणतंही इन्फेक्शन सापडलं नाही. परंतु, रक्त बाहेर पडत असल्यानं ऑलिवाचा त्रास दिवसेंदिवस असह्य होतोय. त्यामुळे तज्ज्ञांनी तात्पुरतं तिला वेदनेपासून वाचवण्यासाठी तिच्या डोळ्यांत काही औषध टाकली आहेत. ‘ही पिडा मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही’ असं ऑलिवानं म्हटलंय.
ऑलिवा इतकी श्रीमंतही नाही की एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, यासाठी तिनं मदतीसाठी शेजारी आणि मित्रांकडे मदत मागितलीय. तिच्या वडिलांनीही आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी लोकांकडे मदतीचा हात मागितलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.