www.24taas.com, झी मीडिया, दुबई
दुबईमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या नॉर्वेमधील एका २५ वर्षीय तरुणीला १६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली आहे. ही तरुणी बिझनेस ट्रिपसाठी संयुक्त अरब अमिरातला गेली होती. इथेच तिच्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार तरुणीने नोंदवली. मात्र पोलिसांनी तिच्यावर अविश्वास दाखवत तिचा पासपोर्ट जप्त केला.
इतकंच नव्हे, तर विवाह न करताच सेक्स केल्याचा आरोप तिच्यावर करून तिला तुरुंगात डांबलं. मार्च महिन्यात ही घटना घडली होती. या आठवड्यात तिला १६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तरुणीवर लग्नाशिवाय सेक्स केल्याचा, मद्यपान केल्याचा आणि खोटी तक्रार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमागील खरं कारण नॉर्वे आणि दुबईमध्ये नसणारे सलोख्याचे संबंध हे आहे. संयुक्त अरब अमिरातीत गुन्हा कबुल केल्याशिवाय शिक्षा देत नाहीत. किंवा गुन्हेगाराविरोधात कुणी साक्ष दिल्याशिवाय आरोपीला शिक्षा होत नाही. यापूर्वीही ऑस्ट्रेलियातील एका २७ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाला होता. तिलाही याबद्दल ८ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.