सरबजीत पार्थिवाचं आता पुन्हा पोस्टमॉर्टम

पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत यांचं पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं आहे. लाहोरहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने सरबजीत यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. तर पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2013, 11:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत यांचं पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं आहे. लाहोरहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने सरबजीत यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. तर पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
भारताच्या पाकिस्तानातल्या उच्चायुक्तांच्या ताब्यात सरबजीतसिंग यांचा मृतदेह देण्यात आल्यानंतर एअरपोर्टवर पाकिस्तानच्या कस्टम्स अधिका-यांनी एनओसी मिळाली नसल्याचा तमाशा करुन काही काळ सरबजीत यांचं पार्थिव विमानतळावरच काही काळ रोखून ठेवण्यात आलं. त्यानंतर काही काळानंतर हे पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं.
भारतात पार्थिव आणल्यानंतर पुन्हा एकदा पंजाबमधील पट्टीमधील रुग्णालयात या पार्थिवावर पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे पार्थिव सरबजीतच्या कुटुंबियांच्या हाती सोपवण्यात येईल. उद्या दुपारी शासकीय इतमामात सरबजीत सिंग यांच्यावर त्यांचे गाव भिखीविंड इथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सरबजीत यांची पाक सरकारनेच हत्या केल्याचा आरोप सरबजितची बहिण दलबीर कौर यांनी केलाय. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरबजीतसिंग यांचा खून घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय.
सरबजीतसिंगचा पाकिस्तानात खून झाला. त्यामुळं पाकिस्तानला याचं उत्तर द्यावं लागेल अशा शब्दात भारतानं पाकिस्तानला ठणकावलय. तर सरबजीतप्रकरणी सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपनं केलीये.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरबजीत प्रकरणी कडक शब्दात केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर ताशेरे ओढलेत. केंद्र सरकार सरबजीत प्रकरणात पूर्णपणे अपयशी ठरलंय अशा शब्दात मोदींनी टीका केली.