www.24taas.com, वृत्तसंस्था, पॅरिस
युक्रेनमध्ये कोणालाही न जुमानता आपले सैन्य घुसविण्याचा निर्णय रशियाला चांगलाच महाग पडलाय. युक्रेनमधील हस्तक्षेप रशियाला भोवल्याचे दिसत आहे. क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून रशियाने मान्यता दिली. तसेच क्रिमियाला सामावून घेण्याच्या करारावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर जी-८ मधून रशियाची हकालपट्टी करण्यात आली आहे.
रशियन सैन्यानी युक्रेनमधील घुसखोरीनंतर अमेरिकेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच फ्रान्सनेही नाराजी व्यक्त केली. रशियावर दबाव टाकूनही रशिया आपल्या निर्णयावर ठाम राहिला. युक्रेनमधील तणावर आणि सेैन्याची घुसखोरी केल्याच्या कारणावरून जी-आठ देशांच्या नेत्यांनी रशियाला संघटनेतून निलंबित केले आहे, अशी माहिती फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.
जी-८ची जून महिन्यात सोची येथे होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीचे यजमानपद रशियाकडे होते. युरोप-१ रेडिओला दिलेल्या मुलाखतीत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लाँरेट फेबियस म्हणाले की, जी-आठ संघटनेतून रशियाचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता रशियाला वगळून अन्य सात देश एकजूट होणार आहेत.
युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी क्रिमियात झालेल्या सार्वमतामुळे परिस्थिती अजून चिघळेल, असे सांगून संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी युक्रेन संकटावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रश्नी शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्व घटकांनी सकारात्मकरीत्या काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक स्तरावरही अनेक देशांनी या सार्वमतावरून कडाडून टीका केली होती. सार्वमतामध्ये बहुतांश नागरिकांनी युक्रेनची फारकत घेण्याकडे कल दाखविला. क्रिमिया बेटावरील बहुसंख्य जनता रशियन भाषिक आहे. दरम्यान, रविवारी क्रिमियात झालेल्या सार्वमतात ९७ टक्के नागरिकांनी रशियात सहभागी होण्याच्या बाजूने कल दिलाय. मात्र, आमच्या दृष्टीने क्रिमिया अजूनही युक्रेनचाच भाग असल्याचे ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनच्या क्रिमिया भागाला रशियात सामावून घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी निर्णायक पाऊल उचलत या संदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. सोमवारी रात्री उशिरा क्रिमियाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्यात आली होती.
युक्रेनचे रशियासर्मथक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर याकुनोविच यांना गेल्या महिन्यात पायउतार करण्यात आल्यानंतर रशिया सर्मथक दलांनी क्रिमियाचा ताबा घेतला होता. रशियाच्या या कृतीचा जगभर निषेध झाला. अमेरिका आणि युरोपियन युनियनने सोमवारी काही रशियन अधिकार्यांविरुद्ध निर्बंधही लादले. त्यातच जी-८ राष्ट्रातून रशियाला निलंबित करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.