www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
जेष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळं त्रस्त होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रेश्मा यांचा जन्म १९४७ मध्ये राजस्थानातील बिकानेर इथं झाला होता. मात्र, फाळणीनंतर त्यांचं कुटुंब कराचीला स्थायिक झालं. रेश्मा यांनी वयाच्या १२व्या वर्षी रेडिओवर पहिलं गाणं गायलं. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलं नाही. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या `हिरो` या चित्रपटातील `लंबी जुदाई`, `दमादम मस्त कलंदर`, `हाय ओ रब्बा नही लगता दिल मेरा`, `आँखियों ने रहने दे अखियों दे कोल-कोल` यासारख्या गाण्यांमुळं त्यांनी भारतीय चाहत्यांची मनं जिंकली होती. पाकिस्तानात लोकगायिका म्हणून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र, कौटुंबिय कारणांमुळं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना पुढं फार यश मिळवता आलं नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.