नदीच्या प्रवाहानं 'पाकिस्ताना'त सोडलेल्या जवानाची आज सुटका

जम्मू-काश्मीरच्या चेनाब नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन पाकिस्तानात पोहचलेल्या सुरक्षा दलाचा एका जवानाला आज सुखरुप भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

Updated: Aug 8, 2014, 11:42 AM IST
नदीच्या प्रवाहानं 'पाकिस्ताना'त सोडलेल्या जवानाची आज सुटका title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या चेनाब नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊन पाकिस्तानात पोहचलेल्या सुरक्षा दलाचा एका जवानाला आज सुखरुप भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन पाकिस्तानाच्या सीमेत दाखल झालेल्या या जवानाला पाकिस्ताननं अटक केली होती. याप्रकरणी भारतानं पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावत जवानाच्या सुटकेची मागणी केली होती.    

बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स या दोघांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवान आज भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या जवानाचं नाव सत्यशील यादव (30 वर्ष) असं आहे.

बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जम्मूच्या सुंदरबनी सेक्टरच्या निकोवाल सीमा पोस्ट भागातील बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सदरम्यान कंपनी कमांडर स्तरावर फ्लॅग बैठक पार पडली. लाहोरमध्ये रेंजर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भारतीय सैनिकाला मुक्त करण्याचा निर्णय जाहीर केलाय. बैठकीत टाकलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं या जवानाची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय. 

बुधवारी, सत्यशील यादव आपल्या तीन साथिदारांसहीत मोटरबोटीतून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर भागात गस्त घालत होता. पण, अचानक मोटरबोटमध्ये काही गडबड झाली. सत्यशीलचे तीन साथीदार पोहत नदीच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. पण, सत्यशील मात्र या प्रवाहात वाहत जाऊन पाकिस्तानातील सियालकोट भागात पोहचला होता. इथं पाकिस्तानी रेंजर्सनं सत्यशीलला ताब्यात घेतलं होतं.

सत्यशील उत्तरप्रदेशातल्या फिरोजाबादचा रहिवासी आहे. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्याची सर्वात लहान मुलगी अवघ्या 9 महिन्यांची आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.