पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची गीता

चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या कथेत मुन्नीला पवन पाकिस्तानात घेऊन जातो. पण प्रत्यक्षात पाकिस्तानात एक अशी मुलगी आहे जी, अनेक वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहतेय. विशेष म्हणजे चित्रपटातील मुन्नी सारखीच ही मुलगी पण बोलू शकत नाही.

PTI | Updated: Aug 3, 2015, 09:08 AM IST
पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची गीता title=

कराची: चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या कथेत मुन्नीला पवन पाकिस्तानात घेऊन जातो. पण प्रत्यक्षात पाकिस्तानात एक अशी मुलगी आहे जी, अनेक वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहतेय. विशेष म्हणजे चित्रपटातील मुन्नी सारखीच ही मुलगी पण बोलू शकत नाही.

'एक्स्प्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्रानुसार 'एदी फाउंडेशन' नावाच्या संघटनेच्या फैसल एदी यांनी सांगितलं की, १३ वर्षांपूर्वी पंजाब रेंजर्सद्वारे गीता नावाची चिमुकली त्यांच्याजवळ आली होती. तेव्हापासून ते लोक तिच्या कुटुंबाबद्दल आणि शहराबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून गीता तिच्या घरी जावू शकेल.

गीताला पहिले लाहोरच्या 'एदी सेंटर'मध्ये आणलं गेलं. तिथून कराचीतील एका आश्रय गृहात तिला पाठवलं. इथं बिलकिस एदी यांनी तिचं नाव 'गीता' ठेवलं आणि तिची खूप काळजी घेतली.

आता गीता २३ वर्षांची झालीय. लहानपणी भटकत भटकत ती पाकिस्तानात पोहोचली होती. वृत्तपत्रानुसार गीतानं फक्त मोबाईलवर भारताचा नकाशा ओळखला आणि ती रडायला लागली. नंतर तिनं नकाशावर पहिले झारखंड आणि नंतर तेलंगणावर बोट ठेवलं.

आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून गीतानं सांगितलं तिला सात भाऊ आणि चार बहिणी आहेत. फैसल एदी यांनी सांगितलं, 'आम्ही तिला लिहून दाखवलं. मात्र काहीच पुञे आलं नाही.' 

आश्रय गृहातील व्यक्तींनी तिची उत्तम काळजी घेतलीय. तिच्यासाठी देवघर बांधलं, हिंदू देवतांचे फोटो लावले. 
गीताची अनेक वेळा मुलाखत घेण्यात आली, तिचा फोटो दाखवण्यात आले पण तिच्या कुटुंबियांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. अनेकांनी गीताला समजावलं की, तिनं हिंदू मुलासोबत लग्न करून आपलं आयुष्य सुखानं जगावं, पण आपल्या सांकेतिक भाषेत तिनं याला नकार दिलाय. जोपर्यंत तिचे कुटुंबीय मिळत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.