www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
विना ड्रायव्हर चालणारी कार ऐकायला अशक्य वाटतं ना... पण हे गुगलनं सिद्ध करुन दाखवलंय. ड्रायव्हर नसलेली कार अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलीय. ही शास्त्रज्ञांची टीम एका भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली काम करत असून, ही कार `क्रॅश-प्रूफ` असल्याचं तिच्या `टेस्ट ड्राइव्ह`मध्ये स्पष्ट झालंय.
भारतीय शास्त्रज्ञ राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली कार्नेजी मेलॉन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही कार विकसित केली आहे. ही कार कोंडीतून वाट काढू शकते, हायवेवरील ट्रॅफिक लक्षात घेऊन लेन बदलू शकते या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. अमेरिकेतील क्रॅनबेरी, पॅसाडेना ते पिट्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ या ५३ किलोमीटर अंतरावर या कारची यशस्वी `टेस्ट ड्राइव्ह` घेण्यात आलीय. या `टेस्ट ड्राइव्ह`दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून ड्रायव्हर सीटवर ड्रायव्हर बसला होता. मात्र, त्याला काही काम करावं लागलं नाही.
कारची वैशिष्ट्य-
> कारमधील यंत्रणेद्वारं स्टिअरिंग, स्पीड, ब्रेक यांचं नियंत्रण.
> रस्त्यातील अडथळे, ट्रॅफिक, पादचारी, सायकलस्वार यांना न ठोकता सुरक्षितपणे कार मार्ग काढते.
> कारमधील यंत्रणा अडथळ्यांची माहिती माणसासारख्या आवाजात कारमधल्या प्रवाशांना देते.
> विशिष्ट ट्रॅफिक सिग्नल आणि वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसशी ती `संवाद` साधू शकते.
अपघात टाळणं हे या कारनिर्मितीमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळं कारमध्ये बसवलेले रडार, लिडर आणि इन्फ्रारेड कॅमेरा यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आधारं कार नियंत्रित करणारे कारमधील नावीन्यपूर्ण सॉफ्टवेअर अत्यंत योग्य पद्धतीनं काम करीत असल्याचंही टेस्ट ड्राईव्हमधून सिद्ध झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.