पाकच्या राष्ट्रपतीपदी ममनून यांनी घेतली शपथ!

भारतात जन्मलेले आणि राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे ममनून हुसैन यांनी सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 10, 2013, 02:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
भारतात जन्मलेले आणि राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे ममनून हुसैन यांनी सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
पाकिस्तानात पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीनं सत्तेचं हस्तांतरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इफ्तिखार चौधरी यांनी प्रेसीडन्सीमध्ये हुसैन यांना शपथ दिली. या सोहळ्यासाठी शरीफ, तीनही सेनादलाचे प्रमुख आणि सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित झाले होते.
राष्ट्रपतीपदावर पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे आणि पद खाली करणारे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी या सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे टीव्ही चॅनल्सवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं.
झरदारी हे संविधानिक कार्यकाळ पूर्ण करणारे देशाचे पहिले राष्ट्रपती ठरलेत. हुसैन हे देशाचे बारावे राष्ट्रपती आहेत.
झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीनं राष्ट्रपती निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. झरदारी यांनी हुसैन यांना शुभकामना दिल्यात.
३० जुलै रोजी झालेल्या एकतर्फी निवडणुकीत ७३ वर्षीय हुसैन यांनी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे उमेदवार आणि माजी न्यायाधीश वजीहुद्दीन अहमद यांचा पराभव केला होता.

आग्र्यात जन्मलेल्या परंतु १९४७ मध्ये झालेल्या फाळनीनंतर पाकिस्तानात स्थायिक झालेले हुसैन सत्तारुढ पीएलएमएन पक्षाचे उमेदवार होते. कराचीमध्ये त्यांचा कपडा व्यापार प्रसिद्ध आहे. त्यांनी जून-ऑक्टेबर १९९९ साली थोड्या काळासाठी दक्षिण सिंध प्रांताच्या गव्हर्नरपदावरही काम केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.