www.24taas.com, लंडन
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर बर्फवृष्टीमुळे रविवारी रात्री १३०० विमानोड्डणांपैकी जवळपास अर्धी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये मुंबईला जाणारी फ्लाईटसही होती. युरोप, अमेरिका, भारत आणि अनेक देशात जाणाऱ्या विमान सेवांवर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे हिथ्रोवर प्रवाशी संतप्त झाले. विमानसेवांबरोबरच रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आणि बर्फामुळे रस्त्यांवर लोकांनी कार सोडून दिल्याचं दिसून आलं.
ब्रिटनमधल्या मोटरवेवर गाड्या खोळंबल्याने अनेक चालकांना रात्र गाडीतच काढावी लागली. दक्षिण स्कॉटलंड आणि वेल्समध्येही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. लंडनच्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी १०,००० टन मीठ पसरण्यात आलं. विमान सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्यात आल्याचं हिथ्रो विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. युरोपमध्ये काही ठिकाणी तापमान उणे ३० पर्यंत खाली घसरलं. युक्रेनमध्ये कडाक्याच्या थंडीच्या लाटेत जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला आहे.