Year Ender 2015 : आपण हे हिरे गमावले...

Updated: Dec 18, 2015, 02:16 PM IST
Year Ender  2015 : आपण हे हिरे गमावले...  title=

आपण हे हिरे गमावले... 
* २ जानेवारी २०१५ - वसंत गोवारीकर, ज्येष्ठ संशोधक

* ७ फेब्रुवारी, २०१५ - आत्माराम भेंडे, ज्येष्ठ अभिनेते

* १६ फेब्रुवारी २०१५ - आर आर पाटील, माजी उपमुख्यमंत्री

* २० मार्च २०१५ - शाहीर साबळे 

* ६ जुलै २०१५ -  प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री

* २५ जुलै २०१५ - रा. सू गवई, ज्येष्ठ दलित नेते 

* २७ जुलै २०१५ – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती

* २९ जुलै २०१५ - सुनिती सोलोमन, संशोधक 

* २० सप्टेंबर २०१५ - जगमोहन दालमिया, बीसीसीआय अध्यक्ष

* ८ ऑक्टोबर २०१५ - गजानन पेंढारकर, 'विको'चे अध्यक्ष

* १६ ऑक्टोबर २०१५ - मदन पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र

* १५ नोव्हेंबर २०१५ - सईद जाफरी, ज्येष्ठ अभिनेते 

१७ नोव्हेंबर २०१५ - अशोक सिंघल, संस्थापक, विश्व हिंदू परिषद

* १२ डिसेंबर २०१५ - शरद जोशी, शेतकरी संघटनेचे नेते 

२ जानेवारी २०१५ - वसंत गोवारीकर, ज्येष्ठ संशोधक
ज्येष्ठ संशोधक आणि पुणे विद्यापाठीचे माजी कुलगुरु डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन झालं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. भारतातील मूलभूत समस्यांची जाण असणारे तसंच त्या  सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे आयुष्यभर प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ अशी गोवारीकर यांची ओळख होती. डॉ. गोवारीकर यांच्या निधनानं अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात महत्वाचं संशोधन करणारा हरपलाय. गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकरांनी इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचं अध्यक्षपदही भुषवलं.
 

७ फेब्रुवारी, २०१५ - आत्माराम भेंडे, ज्येष्ठ अभिनेते
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून कारर्कीद सुरू केली होती. आत्माराम भेंडे यांनी नाट्य संमलेनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
 

१६ फेब्रुवारी २०१५ - आर आर पाटील, माजी उपमुख्यमंत्री
राजकारणातील सर्वसामान्यांचा चेहरा आकर्षणाचा चेहरा ठरलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचं निधन मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झालं. निधनाच्या वेळी आबा ५७ वर्षांचे होते.
आर.आर.पाटील यांची अनेक दिवसांपासून कर्करोगांशी झुंज सुरू होती. फेब्रुवारीमध्ये आर.आर.पाटील यांची प्रकृती अचानकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. आबा हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून होते. म्हणून महाराष्ट्राचे आबा गेले असा सर्वसामान्यांचा सूर आहे.  
 

२० मार्च २०१५ - शाहीर साबळे
'महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले शाहीर साबळे यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. जय जय महाराष्ट्र माझा... हा खड्या आवाजातला शाहीर साबळेंचा पोवाडा घराघरांत दाखल झाला होता. जागृती शाहीर मंडळाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार केले. स्वातंत्र्य चळवळ असो की, हैदराबाद मुक्ती संग्राम... संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की, गोवा मुक्ती आंदोलन... शाहिरांचा डफ कडाडत राहिला.
 

६ जुलै २०१५ -  प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री
राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह माहिते-पाटील यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर शंकरनगर येथील पिंपळाचा मळा येथे अंत्यसंस्कार पार पडले. शरीरात अंतर्गत संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 

२५ जुलै २०१५ - रा. सू गवई, ज्येष्ठ दलित नेते 
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रा. सू. गवई (रामकृष्ण सूर्यभान गवई) यांचं नागपूरमध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. 
मुरब्बी राजकारणी म्हणून रा.सू.गवई यांची ख्याती होती. १९६८ ते ७८ विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि १९७८ ते ८२ विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. १९९८-९९ लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.
 

२७ जुलै २०१५ – अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शिलाँग इथं आयआयएमच्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान ते मंचावरच कोसळले, त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या धक्क्यानं संध्याकाळी सात वाजून ५४ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. 
 

२९ जुलै २०१५ - सुनिती सोलोमन, संशोधक 
देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या सुनिती सोलोमन यांचं चेन्नईमध्ये कर्करोगानं निधन झालं. सुनिती यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला होता. १९८५ मध्ये देशात एड्सचा वेगानं प्रसार होत असताना,डॉ सुनितींनी पुढाकार घेऊन एड्स प्रसाराची कारणं, त्यावरच्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा, आणि भारतात त्याबाबतची जागृती यासाठी सारं आयुष्य वेचलं. सार्वजिनक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचं काम साऱ्या जगात वाखाण्यात आलं.
 

२० सप्टेंबर २०१५ - जगमोहन दालमिया, बीसीसीआय अध्यक्ष
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. क्रिकेट विश्वाला आर्थिक चणचणीतून बाहेर काढून आर्थिक महासत्ता बनवणारे, खेळाला पैसा, प्रसिद्धी, मान मिळवून देणारे, एकिकडे धुर्त राजकारणी अशी प्रतिमा असताना खेळ आणि खेळाडूंचा विकास करायचा हे ध्येय उराशी बाळगून सत्यात उतरवणारे, कधीही पुनरागमन करून प्रतिस्पर्ध्यांना चकित करणारे अशी त्यांची ख्याती होती.
 

८ ऑक्टोबर २०१५ - गजानन पेंढारकर, 'विको'चे अध्यक्ष
'विको' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर ८२ वर्षी प्रदीर्घ आजारानं आज निधन झालं. परळमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९५७ मध्ये वडिलांच्या व्यवसायात सहभागी होत गजानन पेंढारकर यांनी 'विको'च्या माध्यमातून आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल ४५ वर्षांपासून विको म्हणजेच विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनीची धुरा संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे सांभाळली होती. विकोची आयुर्वेदिक उत्पादनं जागतिक स्तरावर नेऊन पेंढारकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वेगळा ठसा उमटवला. 
 

१६ ऑक्टोबर २०१५ - मदन पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र
राज्यातील माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं वयाच्या ५५ वर्षी मुंबईत निधन झालं. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मदन पाटील हे सांगलीचे माजी खासदार आणि माजी आमदार होते. २००९ साली आघाडी सरकारमध्ये पाटील यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण, पणन आणि रोजगार हमी योजना मंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. सांगली महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे ते नेते होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आठचं महिन्यांत मदन पाटील यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला. 
 

१५ नोव्हेंबर २०१५ - सईद जाफरी, ज्येष्ठ अभिनेते 
हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सईद जाफरी यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन झालं. शेक्सपिअरच्या नाटकांना घेऊन अमेरिकेच्या यात्रेवर जाणारे जाफरी हे पहिले भारतीय होते. हिंदुस्थानी-ब्रिटिश अभिनेते असलेले सईद जाफरी यांच्या हिंदी सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. जाफरी यांना हिना, शतरंज के खिलाडी, दिल, किशन कन्हैय्या, घर हो तो ऐसा, राजा की आएगी बारात, मोहब्बत, आंटी नंबर वन यांसारख्या सिनेमांतील दमदार अभिनयामुळे ओळखलं जातं. यांशिवाय, चश्मे बद्दूर, मासूम, किसी से ना कहना, मंडी, मशाल, राम तेरी गंगा मैली, राम लखन, अजूबा यांसारख्या सिनेमांतही ते दिसले. 
 

१७ नोव्हेंबर २०१५ - अशोक सिंघल, संस्थापक, विश्व हिंदू परिषद
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं. मृत्यूपूर्वी अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तब्बल २० वर्ष अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख होते. अयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनातले एक प्रमुख शिलेदार म्हणून अशोक सिंघल यांनी काम केलं. बाबरी मशिदच्या उद्धवस्त केल्याप्रकरणी त्यांचावर खटलाही भरण्यात आला.  
 

१२ डिसेंबर २०१५ - शरद जोशी, शेतकरी संघटनेचे नेते 
स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासप्रक्रियेत परिघावर फेकल्या गेलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कांसाठी दिल्लीचं तख्तही हादरवून सोडणारे, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते व संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद जोशी यांच्या निधनामुळं शेतकरी चळवळीचा 'पंचप्राण' गेल्याची भावना व्यक्त होत आहे. जोशी यांनी शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र 'साप्ताहिक वारकरी’चे संपादक व प्रमुख लेखक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे झाली आहेत.