महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!

राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.

Updated: Feb 10, 2016, 09:56 PM IST
महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध! title=

जयपूर : राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.

मुस्लीम धर्मात लग्न लावण्याचा अधिकार केवळ पुरुष काजीलाच आहे. मात्र, राजस्थानातील दोन महिलांनी या परंपरेला फाटा देण्याचं ठरवलंय... आणि या गोष्टीवरुन मोठा हंगामा सुरु झालाय.
 
जयपूरमध्ये राहाणाऱ्या अफरोज आणि आरा बेगम यांनी काझियतची पदवी प्रदान केलीय. मुंबईतल्या 'दारुल उलून निस्वान'मधून या दोघींनी दोन वर्षांपूर्वी ही पदवी मिळवलीय... त्यांच्या म्हणण्यानुसार, आता त्या निकाह लावू शकतात आणि तलाखवर निर्णयदेखील देऊ शकतात. 

मात्र, कुराणातील नियमानुसार पुरुषांसाठी महिला हाकीम बनू शकत नाहीत त्यानूसार महिला काजी देखील बनू शकत नाहीत, असं मुस्लीम धर्मगुरुंचं म्हणणं आहे.

त्यामुळे महिला केवळ कामकाजीच बनू शकतात काजी नाही? असा सवाल उपस्थित होतोय. इतकंच नाही तर कोणत्याही कामासाठी क्षमतेकडे कानाडोळाकरुन कुराणाकडे बोट दाखवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न डॉ. नूर जहाँ यांनी उपस्थित केलाय. 

ही समस्या केवळ एकाच धर्माची नाही... तर प्रत्येक धर्मात हेच चित्र आहे. त्यामुळे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्याचीच शिकवण प्रत्येक धर्मातून दिली गेलीय का? याचं उत्तर जर नकारार्थी असेल तर उलेमाच नसेल राजी तर काय करणार महिला काजी? हा सवाल नक्कीच विचारला जाईल...