www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
काँग्रेसचा धुव्वा उडवत राजस्थानमध्ये एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांनी जयपूर येथे शाही कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारोह विधानसभा परिसरात झाला. यावेळी जवळपास ३० हजारांपेक्षा जास्तीचा समुदाय उपस्थित होता.
शपथविधी सोहळ्यासाठी जयपूरला सजविण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक केंद्रीय नेते आणि बॉलिवूडचे तारे उपस्थित होते. राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. वसुधरा यांच्यासोबत काही कॅबिनेट मंत्रीदेखील शपथ घेतील, अशी शक्यता होती. परंतु, तसे झाले नाही. शपथविधी सोहळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची गळाभेट घेतली.
यावेळी लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थत होते. वसुंधरा यांच्या भगिनी यशोधरा राजे यादेखील सहभागी झाल्या होत्या. जयपूर येथील जनपथवर सर्वसामान्य जनतेची प्रचंड गर्दी होती. या ठिकाणी बसण्यासाठी ३० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.