नई दिल्ली : सरकारनं जवळपास सहा करोड अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना डिजिटल साक्षरता पुरवण्यासाठी एक नवा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलीय.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ चा अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. ग्रामीण भारतासाठी 'डिजिटल साक्षरता मिशन' सुरु करण्याची ही योजना आहे. यामुळे येत्या तीन वर्षांत जवळपास सहा करोड अतिरिक्त कुटुंब यामध्ये सहभागी होतील. या योजनेचं विस्तृत स्वरुप लवकरच मांडण्यात येणार आहे.
याआधीही, सरकारनं राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन आणि डिजिटल साक्षरता अभियान या दोन योजनांना अगोदरच मान्यता दिलीय.
जवळपास १६.८ करोड ग्रामीण कुटुंबांपैंकी जवळपास १२ करोड घरांत आजही कम्प्युटर नाही आणि त्यामुळेच ते डिजिटल स्वरुपात साक्षर होणं थोडं कठिण आहे. डिजिटल साक्षरता याचा अर्थ कम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन सारख्या उपकरणांना आणि इंटरनेटचा वापर करण्याची माहिती तळागाळापर्यंत पोहचवणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय.