नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. 2017-18चा अर्थसंकल्प, GSTशी संबंधित चार विधेयकांसह अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली. या अधिवेशनात लोकसभेनं 114 टक्के तर राज्यसभेनं 92 टक्के कामकाज केल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलंय.
लोकसभेमध्ये 23, राज्यसभेमध्ये 14 विधेयकांना तर दोन्ही सभागृहांनी 18 विधेयकं मंजूर केली. लोकसभेच्या इतिहासामध्ये हे अधिवेशन सर्वाधिक फलदायी ठरल्याचं प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिलंय. 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशन सुरू झालं होतं. त्यानंतर दोन सत्रांमध्ये हे अधिवेशन पार पडलं.