www.24taas.com, नवी दिल्ली
आज सकाळी कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच माजी टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासहित आणखी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात होतं त्यांनंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आलं.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’नं जंतरमंतरवर आंदोनलनाची परवानगी मागितली होती. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांना घेराव घालण्याची योजना कार्यकर्त्यांनी आखली होती. घेराव घालण्यासाठी सगळे कार्यकर्ते जंतरमंतरवरूनच पुढे जाणार होते. पण, दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली. शनिवारी संध्याकाळीच पोलिसांनी माजी टीम अण्णा सदस्यांना याबद्दल चेतावणीही दिली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानांच्या बाहेर आंदोलन केली तर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.
आज सकाळीच टीम अण्णांचे कार्यकर्ते नवी दिल्लीतील ‘७ रेसकोर्स’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचले. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधानांच्या निवासस्थान ७-रेसकोर्सबाहेर निदर्शनं करताना अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांना ताब्यात घेण्यात आलं तर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मनिष सिसोदिया, संजय सिंह, कुमार विश्वास यांच्यासहित काही कार्यकर्त्यांना सोनियांच्या ‘दहा जनपथ’ या निवासस्थानासमोर आंदोलन करताना ताब्यात घेण्यात आलं. आंदोलन होऊ नये अशी खबरदारी पोलिसांनी घेतली असूनही आंदोलकांनी मात्र पोलिसांनाही चकमा देऊन निदर्शनं केली. कलम १४४ नुसार पंतप्रधान निवास, सोनिया गांधी यांचे १० जनपथ आणि गडकरींच्या निवासस्थानी जमावबंदी लागू केली असतानाही आंदोलनकांनी त्या ठिकाणी घुसून आंदोलन केलं. यानंतर सर्व आंदोलकांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
अण्णांच्या सर्व सहकाऱ्यांना बवाना स्टेडियमवर नेण्यात आलयं. या ठिकाणी तात्पुरता तुरुंग बनवण्यात आलाय. पोलिसांनी या आंदोलकांना सोडून दिलं असून आता सर्व आंदोलक जंतरमंतरवर गोळा झाले आहेत. तिथं आंदोलनाची पुढची रणनिती ठरवण्यात येणार आहे.