मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला प्रमुख आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार आणि दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याला यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला नोटीस पाठवली असून पुढील सुनावणीपर्यंत मेमनच्या फाशीस स्थगितीचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. कट रचल्याच्या आरोपांमध्ये असलेल्या कायदेशीरबाबींवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
मृत्युदंडाची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत बंद चेंबरमध्ये हाताळली जात नाहीत तर खुल्या न्यायालयात हाताळली जातात. या मुद्द्यावरून मेमनची मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबतची याचिका घटनापीठाकडे पाठविण्यात आली होती.
यावर बुधवारी सुनावणी दरम्यान, ज्या कैद्यांची फाशीच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे पण, अजून फाशी देण्यात आली नाही. अशा कैद्यांना खुल्या न्यायालयात सुनावणी होण्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांनी बुधवारी सांगितले.
या पार्श्वभूमीवर मेमनच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मेमनच्या शिक्षेवरील सुनावणी देखील आता खुल्या न्यायालयात होणार आहे. यानंतर याकुब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.