साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!

उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.

Updated: Sep 21, 2016, 03:10 PM IST
साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं! title=

मुंबई : उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.

मसूद आणि हाफिजनं रचला हल्ल्याचा कट?

उरी दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अजहर असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून लावला जात होता. आता नव्यानं हाती आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा हात असण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या २६/११ हल्ल्याचा मुख्य आरोपी हाफिज सईद यानं मसूद अजहरसह या हल्ल्याचा कट रचला आणि घातपात घडवल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. उरी हल्ल्याच्या तपासात लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदचे काही स्टॅम्प्स सापडलेत. त्यामुळं २६/११ हल्ल्याच्या धर्तीवरच उरी हल्ला घडवून आणल्याचं आता समोर येतंय.

२६/११ चा दहशतवादी हल्ला...

उरी दहशतवादी हल्ल्यात कंठस्नान घालण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांकडून २ जीपीएस सेट, २ रेडिओ सेट, २ नकाशे, २ मॅट्रिक्स शीट जप्त करण्यात आल्यात. याचाच अर्थ असा की दहशतवादी २-२ च्या गटाने हा हल्ला घडवत होते. हा प्लान अगदी २६/११ च्या हल्ल्यासारखाच आहे. कारण त्यावेळी क्रूरकर्मा कसाब आणि त्याचे दहा साथीदार दोन-दोनचे पाच गट करुन मुंबईत पसरले होते.

उरी दहशतवादी हल्ला

२६/११ च्या धर्तीवर उरीतल्या दहशतवाद्यांकडे अन्न आणि औषधाची पाकिटे सापडलीत. जास्त वेळ सुरक्षा रक्षकांचा सामना करता यावा यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. हल्ला जास्त वेळ सुरु राहावा यासाठी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं आणली होती. उरीतही हेच साम्य पाहायला मिळालं.

बुरहान वानीच्या खात्म्यानंतर...

पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून मिळणाऱ्या मदतीमुळं हाफिज सईदला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पुरवणं कठीण बाब नाही. बुरहान वानी या दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर हाफिजनं बदला घेण्याची भाषा केल्यानं उरी हल्ल्याचा संशय त्याच्यावर घेतला जातोय. फक्त चार दहशतवाद्यांनी उरीत हल्ला केलाय. त्यामुळं आणखी काही दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात लपले असण्याची शक्यता आहे. आता उरी हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ कितीवर मौन बाळगणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.