धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Updated: Feb 28, 2016, 11:57 AM IST
धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ title=

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका नव्या संशोधनानुसार गेल्या १५ वर्षांत भारतात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत तब्बल ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतात सध्या किमान १०.८ कोटी लोक धुम्रपान करतात असा दावा या संशोधकांनी केला आहे. कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील मूळचे भारतीय वंशाचे असणारे प्रभात झा आणि त्यांच्या एका गटाने केलेल्या संशोधनात ही आकडेवारी पुढे आली आहे. 

१९९८ साली भारतात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांची संख्या ७.९ कोटी इतकी होती. २०१५ साली हा आकडा १०.८ कोटी इतका झाला आहे. दरवर्षी धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत १७ लाखांची भर पडत आहे. २०१० साली भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १० टक्के मृत्यूंसाठी धुम्रपान जबाबदार होते, अशीही माहिती यातून पुढे आली आहे. विडीपेक्षा लोक सिगारेट ओढण्याला जास्त पसंती देतात अशीही माहिती यातून पुढे आली आहे. 

लोकसंख्या जास्त असल्याने चीन या यादीत भारताच्या पुढे आहे. पण, काहीच वर्षांत भारत चीनलाही मागे टाकू शकेल, अशीही शक्यता या संशोधकांनी वर्तवली आहे. या संबंधीचा एक अहवाल 'ग्लोबल हेल्थ जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे.