'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'

हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 17, 2012, 12:20 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.
वाढते बलात्कार रोखण्यासाठी मुलींचं लग्न १५ वर्षांतच करण्याचा फतवा काही दिवसांपूर्वी खाप पंचायतीनं काढला होता. त्याला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनीदेखील पाठिंबा दिला होता. आता, जितेंद्र छत्तर या एका खाप पंचायतीच्या नेत्यानं आपलं डोकं लढवलंय. हरियाणातले दुष्कर्म, बलात्कारांमागंचं मुख्य कारण म्हणजे सिनेमा आणि संस्कृतीत झालेले बदल, असं त्यांनी म्हटलंय. पुढे ते सांगतात, ‘यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे फास्ट फूड म्हणजेच चायनिज, बर्गर, पिज्जासारख्या गोष्टींमुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ झालीय’.
यानंतर, छत्तर यांनी एखाद्या विशेषज्ज्ञाप्रमाणे गंभीर मुद्रा करून म्हटलं की, ‘फास्ट फूडचा शरिरावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा आपण फास्ट फूड खातो तेव्हा शरिरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे शरिरात सेक्सचं हार्मोन्सचं प्रमाण तीव्रतेनं वाढण्यास सुरूवात होते. त्यामुळे उत्तेजना निर्माण होते. हे रोखण्यासाठी आपण फास्ट फूडनंतर काही थंड गोष्टी खायला हव्यात. नाहीतर फास्ट फूड बंदच करायला हवं.’ यानंतर त्यांनी भारतीय जेवण कसं शरिरासाठी पौष्टीक असतं यावरही उपस्थितांना उपदेश दिला.