नवी दिल्ली : सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.
यावेळी सत्येंद्र यादव यांच्या दीड वर्षाच्या मुलाला भूक लागल्याने त्याने दूध प्यायला मागितलं. मुलाचं रडणं थांबत नव्हतं, म्हणून सत्येंद्र यांनी दूध मिळतंय का याची स्टेशनवर विचारणा केली पण दूध काही मिळत नव्हतं.
सत्येंद्र यादव हैराण होते, त्यांनी अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मेन्शन करुन मोबाईलवरुन ट्वीट केला. ट्वीट असा होता, 'ट्रेन खूप लेट आहे. माझ्या दीड वर्षाच्या मुलाला दूध हवं आहे. इथे कुठेच दूध उपलब्ध नाही.'
सुरेश प्रभू यांनी सत्येंद्र यांना लगेच रिप्लाय दिला, संपर्कासाठी मोबाईल नंबर मागितला. सत्येंद्र यांनी त्यांच्या भावाचा मोबाईल नंबर दिला.
सुरेश प्रभू यांनी गाडी कुठल्या स्थानकाजवळ आहे, याची माहिती घेतली, प्रशासन कुठे कामाला लागलं माहित नाही, पण दीड वर्षाच्या बाळासाठी अवघ्या १० मिनिटांच्या आत दुधाची व्यवस्था झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.