लुधियाना : शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांचे दुःख, समस्या ऐकून घेण्याची गरज आहे. मात्र यात केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी मंगळवारी रेल्वेने प्रवास करत पंजाबमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. काल पंजाबला गेले होते. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी दिल्लीहून रेल्वेनं हा प्रवास केला. यावेळी त्यांनी गाडीतही प्रवाशांशी संवाद साधला. पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. आज सकाळी ते पंजाबहून परतले. केवळ मेक इन इंडिया म्हणून भागत नाही. शेतकऱ्यांच्या भल्याचा या सरकारला विचार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही, पैसे देणे ही चांगली बाब आहे, परंतु, फक्त पैसे देऊन शेतकऱ्यांचे दुःख संपणार नाही.त्यांच्या मनातली गोष्ट ‘मन की बात’समजून घेण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी पंजाबला आलो होतो. मी शेतक-यांच्या भेटी घेऊन त्यांचे दुःख जाणून घेतले. आता महाराष्ट्रातील शेतक-यांना भेटण्यासाठी जाणार आहे. जिथे जिथे शेतकरी व कामगार वर्गावर अन्याय होत असेल व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल तिथे तिथे जाऊन त्यांच्यासाठी आवाज उठवू, असा निर्धार राहुल यांनी यावेळी व्यक्त केला.
पंजाबमधील शेतकरी हे देशाला सर्वाधिक धान्य पुरवतात. मग शेतकरी वर्ग ‘मेक इन इंडिया’घडवत नाही का, असा खोचक सवालही त्यांनी मोदी यांना विचारला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.