उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

Updated: Mar 27, 2016, 03:17 PM IST
 उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू title=

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

शनिवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटने घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी सकाळी घटनेच्या कलम ३५६ अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास संमती दिली आहे. 

रविवारी सकाळी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर राज्यातील सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असंही ते म्हणाले होते. 

गेले काही दिवस उत्तराखंड राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. काँग्रेस सरकारमधील नऊ आमदार सध्या भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात घोडेबाजार वाढल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. राज्यातील सरकार बरखास्त करुन राज्यात लवकरात लवकर निवडणूका घेण्याची मागणीही करण्यात येत आहे.