पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्र लीक, रिलायंसचे ५ जण अटकेत

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केलीय.  

PTI | Updated: Feb 20, 2015, 08:43 AM IST
पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्र लीक, रिलायंसचे ५ जण अटकेत title=

नवी दिल्ली: केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री तेल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित एका बहुराष्ट्रीय कंपनीसह काही खासगी कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या.

आशाराम आणि ईश्वर हे तेल मंत्रालयातील दोन कर्मचारी आणि लालटन प्रसाद, राकेश कुमार आणि राजकुमार चौबे या आणखी तिघांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आल्याचं दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितलं. मात्र मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रं बाहेर नेऊन कोणत्या कंपन्यांना विकण्यात आली आणि त्या कागदपत्रांचं नेमकं स्वरूप काय होतं, याचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. तसंच शुक्रवारी कोर्टासमोर किती जणांना हजर करणार याबाबतही तपास यंत्रणेनं मौन बाळगलं आहे.

मंत्रालयाचं शास्त्री भवन इथलं कार्यालय बंद झाल्यावर हे लोक बनावट ओळख दाखवून आत जात, ड्युप्लिकेट चाव्या वापरून ऑफिस उघडत, हवी ती कागदपत्रं बाहेर नेऊन त्याच्या झेरॉक्स काढून त्या काही कन्सलटन्ली फर्मना विकत असत, असं पोलिसांचं म्हणणं आहे. 

पोलीस आयुक्त म्हणाले की, कागदपत्रं कोणाला दिली गेली हे आम्ही हुडकून काढलं आहे आणि त्यांचाही तपास केला जात आहे. आयुक्त म्हणाले की, गोपनीय माहिती मिळाल्यानं शास्त्री भवनमध्ये सापळा लावून आधी मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघं सापडले.

रिलायन्सची भूमिका

खरं तर पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही खासगी कंपनीचा नामोल्लेख केला नाही. मात्र रिलायन्स इन्डस्ट्रिजच्या प्रवक्त्यानं खुलासा करताना सांगितलं की, आमच्या एका कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आम्हाला कळलं आहे. पण याहून अधिक माहिती आमच्याकडे नाही. आम्हीही आमच्या कठोर निकषांनुसार अंतर्गत चौकशी करीत आहोत. पोलीस तपासात आम्ही सर्व ते सहकार्य करू. खरं तर सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आमची सरकारसोबत आंतरराष्ट्रीय लवादात कारवाई सुरु आहे. त्याचा लवकर आणि न्याय्य पद्धतीनं निपटारा व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे.

पेट्रोलियम मंत्री धमेंद्र म्हणाले की, हा प्रकार म्हणजे आमच्या कारभाराला बट्टा नाही. गेल्या सरकारच्या काळात असे प्रकार सर्रास उघडपणे चालायचे. आम्ही सत्तेवर आल्यापासून सतर्कता वाढविली आणि संशयितांवर पाळत ठेवली म्हणून हे उघड झालं. कोणाचीही गय केली जाणार नाही, याची खात्री बाळगावी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.