श्रीनगर : जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
वीरवाह व्यतिरिक्त अब्दुल्ला सोनावरमधूनही लढले होते. मात्र तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हा निसटता दिलासा जरी त्यांना मिळाला असला तरी अब्दुल्ला घराण्याचा करीश्मा कमी होत चाललाय की काय, अशी शंका यावी अशी ही कामगिरी आहे. ओमर यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांना लोकसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे. भाजपला या निवडणुकांत ऐतिहासिक यश मिळाल्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजपनं मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा दिसून येत आहे. ८७ पैकी ३० जागा जिंकून पीडीपीनं सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारलीय. तर मोदी लाटेच्य़ा जोरावर भाजपनं २५ जागा जिंकून दुसरं स्थान पटकावलंय. त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार सत्तेवर येणार, याबाबतची गणितं आणखी रंजक बनलीत.
भाजप, नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर असं सरकार बनणार? भाजप आणि पीडीपीचं संयुक्त सरकार बनणार? की पीडीपी, काँग्रेस आणि इतर असं नवं सरकार अस्तित्वात येणार? याबाबतची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
धर्मनिरपेक्ष शक्तींचं सरकार सत्तेवर येण्यासाठी पीडीपीला समर्थन देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवलीय. मात्र आता पीडीपीनं निर्णय घ्यावा, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलंय. याउलट झारखंडमध्ये मात्र नरेंद्र मोदींच्या भाजपचं कमळ पुन्हा एकदा फुललंय. झारखंडच्या ८१ जागांपैकी ४१ जागा जिंकून भाजपनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.