www.24taas.com,नवी दिल्ली
नागपूरचे नितीन गडकरी यांचा सलग दुसर्यांदा पक्षाध्यक्ष होण्याचा मान भाजपने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरूस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा भाजप पक्षाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे.
भाजपने सूरजकुंडच्या राष्ट्रीय परिषदेत पक्ष घटनादुरुस्ती मंजूर केली आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांना भाजपा गडकरी यांच्याच नेतृत्वाखाली सामोरी जाणार, हे स्पष्ट झाले. पक्षघटनेतील दुरुस्तीनुसार गडकरी २०१५ पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील.
गडकरी यांच्या अध्यक्षपदाची मुदत डिसेंबरमध्ये संपत होती. प्रत्यक्षात मे महिन्यात मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली होती. तिची औपचारिकता माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला एम. व्यंकय्या नायडू यांनी अनुमोदन दिल्यानंतर पूर्ण झाली.
या दुरुस्तीचा लाभ जिल्हा आणि राज्य पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे प्रदेश आणि जिल्हाध्यक्ष यांना याचा फायदा होईल. गडकरी यांना पक्षाध्यक्ष बनविण्यात प्रमुख भूमिका बजावणारा रा. स्व. संघ त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत आग्रही राहिला आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्या कारकिर्दीत घटनेत दुरुस्ती करून अध्यक्षांचा कार्यकाळदोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला होता.