www.24taas.com,नवी दिल्ली
`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर २९ लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर ८हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
युपीए-२ च्या सरकारला ३ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांच्या निवासस्थानी मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. या पार्टीवर बराच खर्च करण्यात आला. रमेश शर्मा यांनी आरटीआयच्या कायद्याअंतर्गत ही माहिती उघड केली. या माहितीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यामुळे खरंच भारताची आर्थिक अवस्था बिकट आहे का, असा प्रश्न उभा राहिला आहे.
आरटीआयच्या माहितीनुसार जेवणावळीवर ११ लाख ३४ हजार २९६ रुपये एवढा खर्च झाला आहे. उभारण्यात आलेल्या मांडवावर १४ लाख ४२ हजार ६७८ रुपये खर्च झाले आहेत. फुलांवर २६,२४४ रुपये खर्च केले गेले. मेजवानीला एकुण ६०३ जण उपस्थित होते. यात विरोधी पक्षाचे खासदारही उपस्थित होते. त्यांच्यासाठी शाकाहारी, मांसाहारी सर्व प्रकारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. स्टार्टर्सच्या ड्रिंक्समध्ये कलिंगडाचा ज्युस, शहाळ्यांचं पाणी, जलजीरा आणि फ्रुट पंच होतं. याशिवाय फ्राय काजू-बदाम इत्यादी सुका मेवा होता. मुख्य आहारात 56 पक्वान्नं होती. यातील प्रत्येक थाळीची किंमत ८ हजार एवढी होती. जिथे गॅस महाग झाल्यामुळे दोन वेळचं जेवण कसं करावं, असा देशातील गरीब जनतेला प्रश्न पडला असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानी मात्र मेजवान्या झडत आहेत आणि त्यातही भरमसाठ उधळपट्टी होत आहे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.