नवी दिल्ली : आता नवीन वाहन नियमामुळे ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळणार आहे. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाला तर, पोलीस तपासणीच्यावेळी सॉफ्ट कॉपी ग्राहय धरली जाणार आहे. वाहन नोंदणी, इन्शूरन्स कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे. वाहन नोंदणी आणि परवान्यांसाठी राज्यातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जदाराला अर्ज करता येईल. यामुळे अनेक प्रक्रियांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
तसेच सध्याच्या नियमानुसार वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतर महिन्याभरात वाहन परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक होते. आता ही मुदत वर्षभरापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मोटर वाहन कायद्यातील बदलांसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच आरटीओकडून वाहन परवाना आणि रजिस्ट्रेशन कार्ड स्मार्ट चीपच्या स्वरुपात दिले जाईल.
आगामी पावसाळी अधिवेशनात या बदलांवर चर्चा होऊ शकते. चार वर्षांवरील मुलांना हेलमेटसक्ती बंधनकारक करण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच आरटीओ कार्यालयात येण्यापेक्षा प्रक्रिया ऑनलाइन करण्यावर भर राहणार आहे. जेणेकरुन भ्रष्टाचाराला आळा बसेल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षा वाढवण्याबरोबर या सेवा लोकाभिमुख करणे हा सुधारणांचा उद्देश आहे.