नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर आहेत. चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. काय आहे मोदींचा अजेंडा, पाहूयात...
'नी हाव'... म्हणजे चिनी भाषेत हॅलो... पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटतील, तेव्हा 'नी हाव'नंच ते एकमेकांचं स्वागत करतील. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे. भारत आणि चीन म्हणजे आशियातले दोन बडे विकसनशील देश... त्यामुळं दोन्ही देशांसाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणार आहे. चीनला रवाना होण्यापूर्वी 'सीसीटीव्ही' या चिनी सरकारी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी हीच भावना बोलून दाखवली.
१४ ते १६ मे असा तीन दिवसांचा मोदींचा हा चीन दौरा आहे. या दौऱ्यात मोदी राष्ट्रपती जिनपिंग यांचं शहर जियान, राजधानी बीजिंग आणि शांघायला भेट देणार आहेत. भारत-चीन सीमा प्रश्न, सिल्क रोड प्रोजेक्ट, भारतात चिनी गुंतवणूक अशा विविध मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
१७ मे रोजी मोदी मंगोलियाला जाणारायत. तिथल्या संसदेसमोर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १८ आणि १९ मे रोजी मोदी दक्षिण कोरियामध्ये असणार आहेत.
२१ वं शतक हे आशियाचं शतक असेल. अशा वेळी भारत आणि चीननं हातात हात घालून काम केलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. त्याला आता चीन कसा प्रतिसाद देतंय, याकडं भारतीयांचंच नाही, तर अवघ्या जगाचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.