www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने आगामी २०१४च्या निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात ही घोषणा केली. मात्र, यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपली नाराजी कायम ठेवत, यावेळी अनुपस्थित राहणे पसंत केले.
पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी आज भाजपने संसदीय समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीला सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी अडवाणींनी अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्ष नेहमी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करत असतो. यावेळी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अडवाणींचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी त्यांच्या घरी जाणार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले, माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या कार्याची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सामान्य कार्यकर्त्यांचे आभार मानतो. वाजपेयी, अडवाणींच्या परिश्रमांनी वटवृक्ष झालेल्या पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि भारताच्या जनेतच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचे मी सर्वोतोपरी प्रयत्न करेल. आगामी २०१४च्या निवडणुकीत भारताच्या जनतेने भाजपवर विश्वास ठेवावा. देशाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.