लखनऊ : समाजवादी पक्षातली यादवीवर पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव दुःखी झालेत.. सपातील राजकीय नाट्याच्या दुस-या अंकात मुलायम सिंह यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याचं समजतंय. या बैठकीला खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि पक्षातील मोठे नेते सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवसुद्धा या बैठकीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. या बैठकीत मुलायमसिंह यादव मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर मुलायम सिंह यादवांनी रविवारीसुद्दा बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. सगळ्या वादावर सोमवारी बोलणार असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं होतं.
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीतील गृहकलहं आता शिगेला पोहोचलाय. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवलंय. शिवपाल यादव यांच्यासह अमर सिंग यांचे विश्वासू असलेल्या अन्य चार मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्यासह नारद राय, शादाब फातिमा आणि ओमप्रकाश सिंग यांना मंत्रिंमंडळातून डच्चू दिला आहे. कॅबिनेटमधून डच्चू मिळाल्यानंतर शिवपाल यादव यांनी रामगोपाल यादव यांच्यावर टीका केलीये.. सीबीआयपासून वाचण्यासाठी रामगोपाल यांनी भाजपशी हातमिळवणी केलीये हे मुख्यमंत्र्यांना कळायला हवं होतं असं शिवपाल यांनी म्हटलं आहे.