नवी दिल्ली : तुम तो ठहरे परदेसी... किंवा शिर्डी वाले साईबाबा... अशी गाणी पुष्कळदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ऐकली असतील... पण, हीच गाणी म्हणणारे भिकारी तुम्हाला आता 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी' बचाओ अभियानाचा प्रचार करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या भिकाऱ्यांचा आता केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी वापरायचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. मुख्य म्हणजे यासाठी भिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकार रेल्वेमध्ये गाणं म्हणत भीक मागणाऱ्यांना रोजगारही उपलब्ध करून देणार आहे... एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, यासाठी सरकार तीन हजार पुरुष आणि महिला भिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे.
हे प्रशिक्षित भिकारी रेल्वेमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' यांसारख्या सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचा प्रचार करताना दिसतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं या प्रोजेक्टचा पाया रचलाय. हे प्रोजेक्ट साँग अॅन्ड ड्रामा डिव्हिजन आणि ऑल इंडिया रेडिओच्या देखरेखीखाली सुरू करण्यात येईल.
या प्रोजेक्टची सुरुवात पहिल्यांदा मुंबईतून केली जाणार आहे आणि त्यानंतर देशातील वेगवेगळ्या शहरांतही हा प्रोजेक्ट राबवला जाईल. मुंबईमध्ये याच महिन्यात या प्रोजेक्टला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.