नवी दिल्ली : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वसाहतीत एका २६ वर्षीय मॉडेलनं केलेल्या आत्महत्येमुळे दिल्लीची डिफेन्स कॉलनी हादरून गेलीय.
पतीकडून होणाऱ्या अनन्वित छळाला कंटाळून प्रियांका कपूर या मॉडेलनं गळफास लावून आपलं जीवन संपवलंय. उल्लेखनीय म्हणजे, प्रियांकाच्या लग्नाला केवळ तीन महिने झाले होते.
आपली या छळातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या राहत्या घरीच पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा मार्ग प्रियांकाला जवळचा वाटला. तिच्या सुसाईड नोटनंतर तिच्या पतीनंच तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी तिचा पती नितीन चावला याला अटक केलीय.
प्रियांकाच्या बहिणीनं दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा पती नितीन तिला दररोज गुरा-ढोराप्रमाणे बदडत होता... याचा पुरावा म्हणून तिच्या बहिणीनं प्रियांकाचे काही फोटोही सार्वजनिक केलेत. ३० जानेवारी रोजी नितीननं प्रियांकाला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण केली होती... त्यावेळचे हे फोटो आहेत.
या फोटोत प्रियांकाचा संपूर्ण चेहरा सुजलेला दिसतोय. तिच्या डोळ्याला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की तिला डोळाही उघडता येत नव्हता. चेहरा अर्धा काळा-निळा पडलेला दिसत होता. नाकावर, ओठांवरही जखमा आहेत.
करोडपती बिझनेसमन असलेल्या नितीनशी प्रियांकाची पहिली भेट एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. नितीन विवाहित होता. त्याला दोन मुलीही होत्या. पहिल्या पत्नीशी त्यानं घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ६ जानेवारी २०१६ रोजी नितीन आणि प्रियांकाचा प्रेमविवाह पार पडला होता. प्रियांकानं आपल्या आईच्या मर्जीविरुद्ध नितीनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.