लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात समोसा आणि चहावर तब्बल 9 कोटी रुपये खर्च केलेत. 15 मार्च 2012 ते 15 मार्च 2016 या कालावधीत यूपी सरकारने स्नॅक्सवर तब्बल 8,78,12,474 रुपये खर्च केलेत.
ही आकडेवारी राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्वत: विधानसभेत जाहीर केली. समोसा-चहावर सर्वाधिक खर्च कऱणाऱ्यांच्या यादीत सामाजिक कल्याणमंत्री अरुण कुमार कोरी पहिल्या स्थानी आहेत. त्यांनी चार वर्षात 22,93,800 रुपये खर्च केले.
दुसऱ्या स्थानावर शहर विकास मंत्री मोहम्मद आझम खान यांना नंबर लागतो. त्यांनी 4 वर्षात 22,86,620 कोटी स्नॅक्सवर खर्च केले. महिला तसेच बालकल्याण मंत्री कैलाश चौरसिया यांनी 22,85,900 खर्च केले.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हिशेब लावल्यास लोकनिर्माण मंत्री शिवपाल यादव यांनी चहा-समोसा यावर एक रुपयाही खर्च केला नाही. यूपी सरकारमधील अन्य वरिष्ठ मंत्री राम करण आर्य आणि जगदीश सोनकर यांनी समोसा-चहावर गेल्या 4 वर्षात 21 लाखाहून अधिक पैसे खर्च केले.
अखिलेश यादव यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, मंत्री राज्यात प्रति दिन चहा-नाश्त्यावर 2500 रुपये खर्च करतात. तर राज्याबाहेरील दौऱ्यादरम्यान त्यांचा चहा नाश्त्याच्या खर्च 3000 रुपये होतो.
ऑक्टोबर 2015मध्ये पदावरुन हटवण्यात आलेले शिवकुमार बेरिया यांनी आपल्या कार्यकालात 21,93,900 रुपये चहा-नाश्त्यावर खर्च केले होते.
दरम्यान, यूपी सरकारमधील मंत्र्यांच्या या उधळपट्टीवर भाजपने जोरदार टीका केलीय. ही जनतेचीच लूट असल्याचे भाजपचे प्रवक्ते हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी म्हटलेय.