नवी दिल्ली: मनोहर पर्रीकर यांच्या विधानानं पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळतं, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील पर्रीकर यांच्या विधानानं आता पाक दहशतवादी हल्ल्यांचं खापर भारतावरच फोडेल, असं सांगत पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असं विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. या विधानावरुन पाकिस्ताननं भारतावर टीका केली आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा आणि परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. भारतातील सरकारचा मंत्री पहिल्यांदाच अशा भाषेचा वापर करत दहशतवादानं दहशतवाद संपवण्याचं उघडपणं समर्थन करतो. यावरुन पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असल्याच्या शंकांना पाठबळ मिळतं. असं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान भारतासोबत चांगला शेजारी राष्ट्र होण्याचा प्रयत्न करत असून दहशतवाद हा दोन्ही देशांचा शत्रू आहे, असंही त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी गटांनी पर्रीकर यांच्या विधानाचा प्रखर विरोध दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे. 'यापुढे पाकिस्तानमधील प्रत्येक हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं जाईल' असं त्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.