'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत. 

Updated: Jul 10, 2015, 11:48 AM IST
'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च title=

चेन्नई : आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत. 

इस्त्रोच्या आंध्रप्रदेशच्या श्रीहरी कोट्यातल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून हे उड्डाण होईल. या उपग्राहांचं वजन तब्बल १ हजार ४०० किलोहून जास्त आहे तर लांबी ४४.४ मीटर आहे. इस्त्रोनं आतापर्यंत सोडलेल्या ३८ आंतरराष्ट्रीय उपग्रहापैंकी हा पाच उपग्रहांचा संच सर्वांत वजनदार आहे. हे पाचही उपग्रह इस्त्रोच्या व्यावसायिक यशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. 

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)चं हे ३० वं मिशन आहे. या उपग्रहांना ६४७ किलोमीटर दूर सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित केलं जाणार आहे. हे उपग्रह दररोज पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्याचा फोटो घेऊ शकतील. पृथ्वीवरच्या संसाधन आणि पर्यावरणाचं सर्वेक्षण करण्यासाठी तसंच आपत्तीकाळात याचा वापर होऊ शकेल. या मिशनचा जीवनकाळ सात वर्षांचा आहे. 

जगात फक्त सहा देशांकडे भूस्थिर कक्षेत उपग्रह सोडण्याचं तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. आजचं प्रक्षेपण यशस्वी झालं, तर इस्त्रोच्या शिरपेचा नवा तुरा खोवला जाणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.