नवी दिल्ली : भारतीय नौदलात भरीव कामगिरी करणारी विमानवाहू युद्धनौका आय एन् एस् विराट आता सेवानिवृत्त होणार आहे. पण आता सेवेतून जाण्याआधी ती एका शेवटच्या प्रवासाला निघाली आहे.
५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे होणाऱ्या 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू' मध्ये भाग घेण्यासाठी आता आपल्या नौदलातील कारकीर्दीतला शेवटचा प्रवास करते आहे. जर्जर झालेल्या सध्या या नौकेवर सहा हॅरीयर विमानं, सहा सी किंग विमानं आणि चार चेतक हेलिकॉप्टर्स आहेत.
ब्रिटीश नौदलात १९५९ साली 'एच् एम् एस् हर्मस' या नावाने दाखल झालेली ही २८,००० टन वजनाची नौका भारताने १९८७ साली विकत घेतली आणि ती 'आय एन् एस् विराट' नावाने रुजू झाली. ५९ वर्षे वय झालेली ही नौका सध्या जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका आहे. भारतीय नौदलात तिला गंमतीने नौकांची 'आई' म्हटले जाते.
पण आता तिचा खर्च भरपूर वाढल्याने आणि तिचे अनेक भाग खराब झाल्याने ती निवृत्त होणार आहे. कोची शिपयार्ड मध्ये तयार होत असलेली स्वदेशी बनावटीची 'आय एन एस विक्रांत' २०१८ मध्ये तिची जागा घेईल.
विशाखापट्टणमहून मुंबईला परतताना विराट भारताच्या सर्व महत्त्वाच्या बंदरांना सलामी देणार आहे. निवृत्तीनंतर या युद्धनौकेचे एका संग्रहालयात रुपांतर करण्याचा सरकारचा मानस आहे.