हैदराबाद : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला एबीव्हीपीचा नेता नंदम सुशील कुमार आहे, असा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुशील कुमारनं मौन सोडलंय. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सुशीलकुमारनं केलीय.
तसंच या आत्महत्येबाबत सुशीलकुमारनं काही प्रश्नही उपस्थित केलेत. रोहित वेमुलाला दुस-या खोलीत का पाठवण्यात आलं? रोहितच्या आत्महत्येवेळी त्याच्या आसपास असणारे शिक्षक आणि विद्यार्थी काय करत होते? नैराश्येत गेलेल्या व्यक्तीला कसं ओळखायचं याचे धडे त्यांनी आम्हाला दिले, पण रोहित नैराश्येत गेल्याचं त्यांना समजलं कसं नाही, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमारनं दिलीये.
रोहितच्या आत्महत्येमुळे मी पण निराश झालो. मी तीन दिवस माझ्या खोलीच्या बाहेर पडलो नाही, असंही सुशीलकुमार म्हणालाय. रोहितनं आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी मी शंभर-दोनशेवेळा वाचली, त्यात त्यानं कोणाचंही नाव घेतलं नाही, असं सुशीलकुमारनं सांगितलंय. माझ्यात आणि रोहितमध्ये कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, फक्त वैचारिक मतभेद होते, असं स्पष्टीकरण सुशीलकुमारनं दिलंय.