भारताला मिळाली पहिली 'ट्रान्सजेन्डर' प्राचार्या!

भारतात पहिल्यांदाच एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणार आहे.

Updated: May 27, 2015, 08:17 PM IST
भारताला मिळाली पहिली 'ट्रान्सजेन्डर' प्राचार्या! title=

नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणार आहे.

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील 'कृष्णानगर महिला कॉलेज'मध्ये मानबी बंदोपाध्याय या ९ जूनपासून प्राचार्यपदाचा कारभार हातात घेतील. सध्या त्या विवेकानंद महाविद्यालयात बांग्लाच्या असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती प्राचार्यपदी विराजमान होण्याची ही कदाचित भारतातच नाही तर जगभरातील पहिलीच घटना ठरेल.   

कॉलेज सर्व्हिस कमिशननं हा निर्णय घेतल्याचं पश्चिम बंगालच्या शिक्षणमंत्री प्रथा चॅटर्डी यांनी म्हटलंय. यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत, मानबी यांनी कमी वयातच आपल्याला अनेकदा बलात्काराला बळी पडावं लागल्याचं म्हटलं होतं. एक वेळ होती जेव्हा ट्रान्सजेन्डर असल्यानं आपल्याला खूप प्रतारणा सहन करावी लागली. पण हा लढाईनंतर मिळालेला विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

सोमनाथ ते मानबीचा प्रवास... 
अगोदर, मानबी यांचं नाव सोमनाथ होतं. त्यांना दोन बहिणी होत्या. लहाणपणीच आपण मुलगी असल्याचं त्यांना समजलं होतं. पण, त्यांच्या वडिलांना मात्र हे पसंत नव्हतं... डॉक्टरांनीही त्यांना आपण मुलगी आहोत हे विसरून जा... अन्यथा आत्महत्या करावी लागेल, असा सल्ला दिला. 

परंतु, २००३ साली सोमनाथनं यांनी 'सेक्स' बदलण्याचा निर्णय घेतला... आणि ऑपरेशन करवून घेतलं. त्यानंतर त्यांनी 'मानबी' अर्थात 'महिला' हे नाव धारण केलं. 

उल्लेखनीय म्हणजे गेल्याच वर्षी सुप्रीम कोर्टानं 'ट्रान्सजेन्डर'ला तिसऱ्या जेंडरच्या रुपात मान्यता दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.